Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Exodus 26 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

निवासमंडप

1“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या तागाच्या व रेशमी तागाच्या दहा पडद्यांनी निवासमंडप तयार करावा, त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावे. 2सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात असावी. 3पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे. 4जोडलेल्या पडद्यापैकी शेवटच्या पडद्यांच्या किनारीवर निळ्या रंगाच्या कापडाचे फासे बनवावे आणि दुसर्‍या पडद्यांच्या शेवटच्या पडद्यालाही तसेच करावे. 5एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्‍या पडद्याच्या किनारीपर्यंत पन्नास फासे करावे, हे फासे समोरासमोर असावेत. 6मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल.

7“निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत. 8सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात. असावी. 9पाच पडदे एकत्र व इतर सहा पडदे एकत्र असे जोडावेत. सहावा पडदा मंडपाच्या पुढील बाजूस दुमडावा. 10जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्‍या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा. 11मग कास्याचे पन्नास आकडे करावेत आणि ते फासात घालून असे जोडावे की तंबू एकजोड होईल. 12तंबूच्या पडद्याचा उरलेला भाग, म्हणजे जो अर्धा पडदा उरतो, तो निवासमंडपाच्या मागच्या बाजूस टांगलेला असू द्यावा. 13तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हात अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा. 14तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे आच्छादन करावे आणि त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन करावे.

15“निवासमंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या तयार कराव्‍यात. 16प्रत्येक फळी दहा हात लांब व दीड हात रुंद असावी. 17एक फळी दुसर्‍या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी. 18निवासमंडपाच्या दक्षिणेस वीस फळ्या बसवाव्यात. 19आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्‍यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक. 20निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला, म्हणजे उत्तरेला वीस फळ्या बनवाव्या 21आणि प्रत्येक फळीखाली दोन अशा चांदीच्या चाळीस बैठका कराव्या. 22निवासमंडपाच्या शेवटच्या बाजूसाठी, म्हणजे पश्चिम बाजूस सहा फळ्या तयार कराव्या, 23आणि निवासमंडपाच्या मागच्या बाजूच्या कोपर्‍यांसाठी दोन फळ्या तयार कराव्या. 24या दोन कोपर्‍यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्‍यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात. 25एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील.

26“बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करा: निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे, 27निवासमंडपाच्या दुसर्‍या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे. 28मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचतील असे असावे. 29फळ्यांना सोन्याचे आवरण लावावे आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या बनवाव्या. आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण द्यावे.

30“मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे नमुन्याप्रमाणे निवासमंडप तयार करावा.

31“निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या कातलेल्या रेशमी तागाचा पडदा करून त्यावर कुशल कारागिरांकडून करूब विणून घ्यावेत. 32हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा. 33पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल. 34प्रायश्चिताचे झाकण परमपवित्रस्थानात कराराच्या कोशावर ठेवावे. 35निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा.

36“निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या रेशमी तागाचा नक्षीदार पडदा बनवावा. 37या पडद्यासाठी सोन्याचे आकडे आणि सोन्याचे आवरण दिलेले बाभळीच्या लाकडाचे पाच खांब तयार करावेत आणि त्यांच्यासाठी कास्याच्या पाच बैठका तयार कराव्‍यात.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]