Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Revelation 17 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

बाबिलोन व पशूवर स्वार झालेली वेश्या

1पीडांची वाटी ओतणार्‍या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन. 2पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”

3नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली. 4त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता. 5तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: महान बाबिलोन, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची माता.

6मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.

7तेव्हा देवदूत मला म्हणाले: “तू एवढा आश्चर्यचकित का झालास? ती स्त्री कोण आहे आणि ज्या सात डोक्यांच्या आणि दहा शिंगांच्या पशूवर ती स्वार झाली आहे, तो पशू कोण आहे, याचे रहस्य मी तुला सांगतो. 8तो पशू जो तुम्ही पाहिला होता, जो होता, पण आता नाही. तरी लवकरच तो अथांग कूपातून वर येईल आणि सार्वकालिक विनाशाकडे जाईल. पृथ्वीवरील लोकांपैकी ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, ते सर्व लोक पशूला पाहून थक्क होतील. जो पूर्वी होता, आता नाही, पण पुन्हा परत येणार.

9“हे समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती सात डोकी म्हणजे सात टेकड्या आहेत त्यावर ती स्त्री बसते. 10त्याचप्रमाणे ती सात डोकी, सात राजांची प्रतिके आहेत. त्यापैकी पाच राजे आधी पतन पावले आहेत. सध्या सहावा राजा राज्य करीत आहे आणि सातवा अजून यावयाचा आहे; पण त्याची कारकीर्द अल्पकाळच टिकेल. 11जो पशू आधी होता, पण आता नाही, तो आठवा राजा असून, सातापैकी एक आहे, नंतर त्याचाही नाश होईल.

12“त्या पशूची दहा शिंगे म्हणजे दहा राजे असून, ते अजून सत्तेवर आलेले नाहीत. त्यांनीही या पशूबरोबर राज्य करावे, म्हणून त्यांना एका तासापुरती सत्ता देण्यात येईल. 13त्या सर्वांचा एकच उद्देश आहे, ते पशूला आपले सामर्थ्य व अधिकार बहाल करतील. 14ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”

15तेव्हा देवदूत मला म्हणाला, “ती वेश्या ज्यांच्यावर बसली आहे, ते जलप्रवाह म्हणजे प्रत्येक लोक, समुदाय, राष्ट्र व भाषा आहेत. 16तो पशू व जी दहा शिंगे तू पाहिली, ते वेश्येचा द्वेष करतात; ते तिच्यावर हल्ला करतील आणि तिला नग्न करून तिचे मांस खातील व तिला अग्नीने जाळून टाकतील. 17कारण परमेश्वर आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मनात एक योजना घालेल. आपले सर्व अधिकार परमेश्वराचे वचन पूर्ण होईपर्यंत त्या शेंदरी पशूला देण्याचे ते एकमताने आपसात ठरवतील. 18तुझ्या दृष्टान्तात तू पाहिलेली स्त्री, पृथ्वीच्या राजांवर सत्ता गाजवणार्‍या महानगरीचे दर्शक आहे.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]