Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Numbers 3 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

लेव्यांची कर्तव्ये

1सीनाय डोंगरावर याहवेह मोशेबरोबर बोलले, त्यावेळी अहरोन व मोशे यांची वंशावळी ही होती.

2अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार. 3अहरोनाच्या ज्या पुत्रांचा याजक म्हणून अभिषेक करण्यात आला आणि निवासमंडपात सेवा करण्यासाठी समर्पित करण्यात आले, त्यांची ही वरील नावे होती. 4नादाब व अबीहूनी सीनायच्या रानात अनाधिकृत अग्नी वापरल्यामुळे ते याहवेहसमोर मरण पावले, त्यांना पुत्र नसल्यामुळे एलअज़ार व इथामारनी त्यांचे वडील अहरोनाच्या जीवनकाळात याजक म्हणून सेवा केली.

5याहवेह मोशेला म्हणाले, 6“लेवीच्या गोत्राने अहरोन याजकाला मदत करावी म्हणून तू त्यांना त्याच्यासमोर सादर कर. 7त्यांनी सभामंडपात त्याच्यासाठी आणि संपूर्ण समुदायासाठी निवासमंडपाचे काम करून कर्तव्ये पार पाडावीत. 8सभामंडपाच्या सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी, निवासमंडपाचे काम करून इस्राएली लोकांची कर्तव्ये पूर्ण करावी. 9यास्तव लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांच्या हाती द्यावे; संपूर्ण इस्राएली लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आलेले आहेत. 10याजकाची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याच्या पुत्रांची नेमणूक करावी. इतर दुसरे कोणी पवित्रस्थानाच्या जवळ आले, तर त्यास जिवे मारावे.”

11आणि याहवेह मोशेला म्हणाले, 12“इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत, 13कारण सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. ज्या दिवशी इजिप्तमध्ये मी सर्व प्रथम जन्मलेले मारून टाकले, त्या दिवशी इस्राएलातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मी माझ्यासाठी समर्पित करून घेतले, ते मनुष्य असो किंवा पशू, ते माझे आहेत, मीच याहवेह आहे.”

14याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले, 15“आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.” 16याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.

17लेवीच्या पुत्रांची नावे ही: गेर्षोन, कोहाथ आणि मरारी.

18गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.

19कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.

20मरारीची कुळे: महली आणि मूशी. त्यांच्या घराण्यानुसार लेवीची कुळे ही होती.

21लिब्नी व शिमी ही कुळे गेर्षोनापासून होती; ही गेर्षोनी कुळे होती.

22एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती.

23गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.

24गेर्षोनी घराण्याचा प्रमुख लाएलचा पुत्र एलीआसाफ होता.

25सभामंडपात गेर्षोनी लोकांची जबाबदारी ही होती की, त्यांनी निवासमंडप व तंबू, त्याचे आच्छादन, सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, 26आणि अंगणाचे पडदे, निवासमंडप आणि वेदीच्या सभोवतालच्या अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा आणि दोर्‍या व त्याच्या वापराशी संबंधित जे सर्वकाही आहे यांची काळजी घ्यावी.

27अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जीएली हे कोहाथी कुळाचे होते; ही कोहाथची कुळे होती.

28एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 8,600 होती. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी कोहाथी लोकांकडे होती.

29कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.

30उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.

31कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाच्या सेवेत वापरली जाणारी उपकरणे, पडदा आणि त्यांच्या वापराशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यास ते जबाबदार होते.

32अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ार हा लेवींचा प्रमुख पुढारी होता. पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्यांवर त्याची नेमणूक करण्यात आली होती.

33महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.

34एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.

35अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.

36मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी, 37तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्‍या यावर करण्यात आली होती.

38मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.

39याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.

40मग याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांतील एक महिन्याच्या व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या सर्व पुरुषांची गणती करून त्यांच्या नावांची यादी करावी. 41आणि इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेव्यांना माझ्यासाठी घ्यावे आणि इस्राएली लोकांच्या पशूतील सर्व प्रथम जन्मलेल्या वत्सांऐवजी, लेव्याच्या पशूंना माझ्यासाठी घ्यावे. मीच याहवेह आहे.”

42याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली. 43एक महिना व त्याहून अधिक वयाच्या प्रथम जन्मलेल्या पुरुषांची एकूण संख्या 22,273 होती.

44याहवेह मोशेला आणखी म्हणाले, 45“इस्राएली लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी लोकांना घे आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घ्यावे. लेवी लोक माझे असावेत. मीच याहवेह आहे. 46273 इस्राएली लोकांचे प्रथम जन्मलेले जे लेव्यांपेक्षा अधिक आहेत त्यांची खंडणी भरण्यासाठी, 47प्रत्येकामागे पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच शेकेल घे; म्हणजेच वीस गेरा. 48आणि इस्राएली लोकांतील जे अधिक होते त्यांच्या खंडणीचे पैसे अहरोन आणि त्याच्या पुत्रांना द्यावे.”

49मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले. 50इस्राएली लोकांच्या प्रथम जन्मलेल्यांकडून त्याने पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार 1,365 गोळा केले. 51याहवेहच्या वचनाप्रमाणे झालेल्या आज्ञेनुसार मोशेने ते खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या पुत्रांना दिले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]