Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Numbers 21 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

अरादचा नाश

1इस्राएली लोक अथारीमच्या वाटेने येत आहेत असे नेगेवमध्ये राहत असलेला कनानी राजा अरादने जेव्हा ऐकले, तेव्हा त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला व काहींना कैद केले. 2तेव्हा इस्राएलने याहवेहपुढे ही शपथ घेतली: “जर तुम्ही या लोकांना आमच्या हाती दिले तर आम्ही त्यांची शहरे पूर्णपणे नाश करू.” 3याहवेहने इस्राएली लोकांची विनंती ऐकली आणि कनानी लोकांना त्यांच्या हाती दिले. त्यांनी त्यांचा व त्यांच्या नगरांचा पूर्णपणे नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव होरमाह असे पडले.

कास्याचा सर्प

4नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले; 5ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”

6तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले. 7लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

8तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.” 9तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.

मोआबाकडे प्रवास

10इस्राएली लोक प्रवास करीत पुढे निघाले आणि ओबोथ येथे तिथे त्यांनी तळ दिला. 11नंतर ते ओबोथहून निघाले व पूर्वेकडे मोआबासमोर ईये-अबारीम रानात त्यांनी तळ दिला. 12तिथून निघून त्यांनी जेरेद खोर्‍यात तळ दिला. 13नंतर तिथून निघून, अमोर्‍यांच्या रानातील सीमेतून निघणाऱ्या आर्णोन नदीजवळ त्यांनी तळ दिला. आर्णोन नदी मोआबाची सीमा आहे, जी मोआब आणि अमोरी यांच्यामध्ये आहे. 14यावरून याहवेहच्या युद्धाच्या पुस्तकात म्हटले आहे:“…सूफाहतील वाहेबव आर्णोनाचे ओहोळ

15आणि ओहोळांचा जो ओघआर येथील वस्तीकडे वाहतोआणि मोआब प्रदेशालगत आहे.”

16तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

17मग इस्राएलने हे गीत गाईले:“हे विहिरी, उफाळून ये!त्याविषयी गा,

18जी विहीर राजपुत्रांनी खोदली,की ज्यामध्ये लोकांचे सरदार—आपल्या राजदंड आणि काठीसह बुडले.”मग ते त्या रानातून मत्तानाहला गेले,

19मत्तानाहहून नाहालीयेल, नाहालीयेलपासून बामोथास, 20आणि बामोथपासून मोआबामधील खोर्‍यापर्यंत जिथे पिसगाच्या शिखरावर ओसाड जमीन दिसते.

सीहोन व ओगचा पराजय

21इस्राएलने अमोर्‍यांचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले:

22“आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही शेताकडे किंवा द्राक्षमळ्याकडे वळणार नाही किंवा विहिरीतील पाणी पिणार नाही. तुमची सीमा पार करेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच प्रवास करू.”

23परंतु सीहोन राजाने इस्राएलास त्याच्या सीमेमधून जाण्यास परवानगी दिली नाही. त्याने आपल्या संपूर्ण सैन्याला जमा केले व इस्राएला विरुद्ध बाहेर रानात गेला आणि याहस येथे पोहोचल्यावर तो इस्राएलाशी लढला. 24परंतु इस्राएलने त्याला तलवारीवर धरले आणि आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंत, अम्मोनी लोक राहतात तिथपर्यंत त्यांच्या देशावर कब्जा केला, कारण त्यांची सीमा तटबंदची होती. 25याप्रकारे इस्राएलने हेशबोन व आसपासच्या नगरांसह अमोर्‍यांची सर्व नगरे ताब्यात घेतली व त्यात वस्ती केली. 26हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोनचे शहर होते, ज्याने मोआबाच्या पूर्वीच्या राजाशी युद्ध केले होते आणि आर्णोन पर्यंतचा सर्व प्रदेश त्याच्याकडून घेतला होता.

27म्हणूनच कवी म्हणतात:“हेशबोनला या आणि ते पुन्हा बांधू द्या;सीहोनाच्या शहराची पुनर्स्थापना होऊ द्या.

28“हेशबोनमधून अग्नी निघाला,सीहोनाच्या शहरातून ज्वाला निघाली.त्याने मोआबचे आर या आर्णोनाच्या उंच प्रदेशातीलनागरिकांना भस्म केले आहे.

29हे मोआबा, तुझा धिक्कार असो!कमोशाच्या लोकांनो, तुम्ही नष्ट झाला आहात!त्याने आपल्या मुलांना निर्वासित केलेव अमोर्‍यांचा राजा सीहोनच्या हातीआपल्या मुलींना बंदी म्हणून दिले.

30“पण आम्ही त्यांना पराजित केले आहे;दिबोनपर्यंत हेशबोनचे वर्चस्व नष्ट झाले आहे.मेदबापर्यंत पसरलेल्या नोफाहपर्यंत,आम्ही त्यांचा नाश केला आहे.”

31याप्रमाणे इस्राएली अमोरी लोकांच्या देशात स्थायिक झाले.

32मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले. 33नंतर तिथून वळून ते बाशानाच्या वाटेने वर गेले आणि बाशानचा राजा ओग आणि त्याचे सर्व सैन्य जमवून त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी एद्रेई येथे गेले.

34याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”

35तेव्हा इस्राएली लोकांनी त्याला, त्याची मुले व सर्व सैन्यासह नष्ट करून टाकले, त्यांच्यातील कोणीही वाचला नाही आणि इस्राएली लोकांनी त्याचा देश ताब्यात घेतला.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]