Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Acts 1 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

येशू स्वर्गात घेतले जातात

1थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून, 2त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले, त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. 3त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले. 4अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा. 5कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.”

6मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?”

7ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. 8परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”

9असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.

10येशू जसे वर घेतले जात होते तसे त्यांचे शिष्य आकाशाकडे निरखून लावून पाहत होते, एकाएकी पांढरी वस्त्रे घातलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. 11ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.”

यहूदाहच्या जागी मत्थियाची निवड

12नंतर प्रेषित सुमारे शब्बाथ दिवसाच्या वाटचालीवर अंतरावर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर होते तिथून ते यरुशलेमला परत आले. 13तिथे पोहोचल्यावर, ते राहत होते त्या माडीवरील खोलीत गेले. तिथे जे शिष्य उपस्थित होते ते हे: पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया; फिलिप्प आणि थोमा; बर्थलमय आणि मत्तय; अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी आणि याकोबाचा पुत्र यहूदाह.

14हे सर्वजण व येशूंची आई मरीया, त्यांचे भाऊ, इतर स्त्रिया एकत्र येऊन सतत प्रार्थनेत वेळ घालवित असत.

15त्या दिवसांमध्ये पेत्र विश्वासणार्‍या लोकांमध्ये उभा राहिला (ते एकूण एकशेवीस लोक होते) आणि त्याने भाषण दिले. 16तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते. 17तो आपल्यापैकीच एक होता आणि त्याने आपल्या सेवाकार्यामध्ये भाग घेतला होता.”

18यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली. 19ही वार्ता यरुशलेमात राहणार्‍या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले.

20“यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे:“ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो;व त्यात कोणीही वस्ती न करो,’आणि,“ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’

21यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तींपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहात आलेला आहे, 22प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार असणे आवश्यक आहे.”

23तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ, ज्याला बारसब्बास देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली. 24नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा, 25ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.” 26नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]