Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

2 Samuel 8 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

दावीदाने मिळविलेले विजय

1काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर कब्जा केला आणि त्याने मेथेग-अम्माह पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतले.

2दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला. त्याने त्यांना जमिनीवर झोपविले आणि दोरीच्या अंतराने त्यांचे मोजमाप केले. जे दोन दोर्‍या भरले त्यांना मारून टाकले आणि जे एक दोरी भरले त्यांना जिवंत सोडले. याप्रकारे मोआबी लोक दावीदाच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.

3याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला. 4दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.

5जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना मारून टाकले. 6नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथे कुठे गेला, तिथे तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

7हादादेजरच्या अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. 8हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले.

9हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, 10तेव्हा त्याने आपला पुत्र योरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोई यांच्यातही युद्ध होते. योरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या वस्तू आणल्या.

11दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: 12अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.

13क्षार खोर्‍यातील अठरा हजार अरामी लोकांना मारून परत आल्यावर दावीदाचे नाव प्रसिद्ध झाले.

14त्याने एदोमात सर्वठिकाणी ठाणे बसविले आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथे कुठे गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

दावीदाचे अधिकारी

15दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे. 16जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता. 17अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता; 18यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार होते.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]