Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

2 Samuel 10 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

दावीद अम्मोनी लोकांचा पराभव करतो

1कालांतराने, अम्मोन्यांचा राजा मरण पावल्यानंतर, त्याचा पुत्र हानून राजा झाला. 2तेव्हा दावीदाने विचार केला, “जशी त्याचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी त्याचा पुत्र हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाची माणसे अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,

3तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?” 4तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येक मनुष्याच्या अर्ध्या दाढीचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.

5जेव्हा दावीदाला याबाबतीत सांगितले गेले, तेव्हा दावीदाने त्या माणसांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.”

6जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा त्यांनी बेथ-रहोब व अराम-झोबाह येथून वीस हजार अरामी पायदळ, तसेच माकाहच्या राजाबरोबर एक हजार लोक आणि तोब कडून बारा हजार माणसे भाड्याने आणली.

7हे ऐकून, दावीदाने युद्ध करणाऱ्या माणसांच्या संपूर्ण सैन्यासह योआबाला पाठवले. 8तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगरवेशीच्या दरवाजाजवळ येऊन थांबले आणि अराम-झोबाह आणि रहोबचे अरामी आणि तोब आणि माकाहची माणसे मोकळ्या प्रदेशात एकटीच होती.

9शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले. 10बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले. 11योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करण्यास यावे; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन. 12खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.”

13तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले पण ते त्याच्यापुढून पळून गेले. 14जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा ते अबीशाईपुढून पळून शहरात गेले. तेव्हा योआब अम्मोनी सैन्याबरोबर युद्ध करून यरुशलेमास आला.

15नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा ते पुन्हा एकत्र झाले. 16हादादेजरने फरात नदीपलीकडून अरामी सैन्य आणले; हादादेजरच्या सैन्याचा सेनापती शोबाक याच्या नेतृत्वाखाली ते हेलाम येथे गेले.

17याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले, यार्देन नदी पार करून ते हेलामकडे गेले. अरामी सैन्याने दावीदाला भेटण्यासाठी त्यांच्या युद्धाच्या रांगा तयार केल्या आणि त्याच्याविरुद्ध युद्ध केले. 18परंतु अरामी इस्राएली समोरून पळून गेले आणि दावीदाने त्यांच्यातील सातशे रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोबाक याला सुद्धा मारले आणि तो तिथेच मरण पावला. 19जे सर्व राजे हादादेजरचे जहागीरदार होते, यांनी इस्राएलपुढे झालेला आपला पराभव पाहून, इस्राएलशी करार केला व त्यांच्या अधीन झाले. त्यानंतर पुढे अरामी लोक अम्मोनी लोकांना मदत करण्यास घाबरले.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]